Mumbai: मनसेत मोठे फेरबदल: अमित ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या नवीन रणनीतीनुसार, अमित ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षरचनेत मोठे बदल जाहीर केले.

मुंबईत प्रथमच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष पदाची निर्मिती

यावेळी मुंबईत प्रथमच “शहराध्यक्ष” आणि “उपशहराध्यक्ष” पदांची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी पक्षात केवळ विभागाध्यक्ष पद अस्तित्वात होते. आता संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच,

  • पश्चिम उपनगरासाठी कुणाल मेनकर,
  • पूर्व उपनगरासाठी योगेश सावंत यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अमित ठाकरे यांच्यावर शाखा प्रमुखपदाची जबाबदारी

राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना शाखा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली असून, ते मुंबई आणि महाराष्ट्रभर पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करणार आहेत. तसेच, बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठाण्यातही नव्या समितीची स्थापना

मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नव्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजित पानसे आणि गजानन काळे या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. आगामी एप्रिल-मे महिन्यात ही संपूर्ण रचना महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. (Mumbai News Marathi)

संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप देशपांडे म्हणाले,
“ही मोठी जबाबदारी असून, आमचं पहिलं लक्ष्य ‘मिशन मुंबई’ असेल. मुंबई महापालिका निवडणूक ताकदीनं लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे. या बदलामुळे मनसेची ताकद वाढेल.”

मनसेचा फोकस – “मिशन मुंबई”

मुंबई महापालिकेत आपली ताकद वाढवण्यासाठी मनसेकडून “मिशन मुंबई” ची सुरुवात करण्यात आली आहे. नव्या पक्षरचनेच्या माध्यमातून मनसे अधिक आक्रमक रणनीती अवलंबणार आहे. आगामी काळात हे बदल पक्षाला कितपत यश मिळवून देतील, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.